प्रस्तावना'कर्करोग' हे नाव ऐकताच माणूस भीतीने गांगरून जातो...पण चिंता नको...

केवळ सतर्कता, प्रतिबंध आणि उपलब्ध उपचार यांच्या उपयोगाने कर्करोगाचा प्रादुर्भाव, वाढ, पुनरावृत्ती, शरीरांतर्गत प्रसार वगैरे गोष्टी रोखता येऊ शकतात आणि रुग्णाचे जीवनमान वाढवता येऊ शकते. एक गोष्ट मात्र खरी की सुरुवातीच्या काळात वेळीच निदान झाले,योग्य उपाययोजना व उपचार मिळाले तर कर्करोग बरा होऊ शकतो. नियंत्रणात राहू शकतो.

कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना शरीराच्या कोणत्याही भागामध्ये किंवा रक्तातसुद्धा कर्करोग होऊ शकतो. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग यांचं प्रमाण फार मोठं आहे. याकडे दुर्लक्ष करण्याचे अथवा दुखणे अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागतात.

या पार्श्‍वभूमीवर महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी सतर्कता निर्माण व्हावी, प्रतिबंधात्मक उपाय, कारणे, लक्षणे, काळजी, तपासणी व उपचार याबाबत माहिती मिळावी, ज्ञान मिळावे आणि सजगता निर्माण व्हावी यासाठीच वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी हे जागृती अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाचा भाग असणार आहे, 'नो टच ब्रेस्ट स्कॅन' ( No Touch Breast Scan ) ही स्तन कर्करोगाची तपासणी. महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधून हा तपासणी उपक्रम 'नो टच ब्रेस्ट स्कॅन' या अत्याधुनिक यंत्राद्वारे कायमस्वरूपी विनामूल्य करण्यात येणार आहे.